For best result view this page in Firefox or Internet Explorer.
तीळ गुळ घ्या गोड बोला ! जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण "मकर संक्रांत", आणि संक्रांत म्हटली की गुळाची पोळी, तीळ गुळ आलंच पाहिजे. खुप ठिकाणी संक्रांतीचा सण पतंग उडवुन साजरा केला जातो. तसेच बायकांची हळदी कुंकु सुरु होतात. माझ्या लहानपणी माझी आई हळदी कुंकू करायची आम्हाला खुप मजा यायची. आईला मदत म्हणुन आम्ही आलेल्या बायकांना कुंकू आणि तीळगुळ द्यायचो. लहानपणीच्या आठवणी अजुनही मनात घर करून आहेत. संक्रांतीची गोड आठवण म्हणजे आईने केलेली गुळाची पोळी, त्याची चव अजुन ही माझ्या तोंडात रेंगाळत आहे.
साहित्य (ह्या मापात मध्यम आकाराच्या २० पोळ्या बनतात)
(गुळासाठी )
२ कप किसलेला गुळ
१/४ कप तीळ
१ १/२ टेबल स्पुन खसखस
१/२ कप बेसन
१ १/२ टेबल स्पुन तेल
१/४ टीस्पून वेलदोड्याची पुड
१/८ टीस्पून जायफळाची पुड
३ कप कणिक
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
२ टेबल स्पून बेसन
१/३ कप गरम तेलाचे मोहन
लागेल तशी तांदुळ पिठी पोळी लाटायला
कृती
प्रथम तेलावर बेसन खमंग भाजुन घ्या. तीळ आणि खसखस वेगळी वेगळी भाजुन घ्या. गार झाल्यावर खसखस आणि तीळ बारीक वाटुन घ्या. गुळासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करा आणि गुळ चांगला मळून घ्यावा. तयार गुळाच्या गोळ्या बनल्या पाहिजेत.
कणकेचे साहित्य एकत्र करून कणिक घट्ट भिजवा. अर्धा तास कणिक मुरु द्यावी. गुळाचा प्रथम एकसारख्या गोळ्या बनवुन ठेवा.
कणकेचे २ गोळे घ्या(एक छोटा आणि एक मोठा) त्याच्या दोन पुऱ्या लाटा(एक छोटी आणि एक मोठी). गुळाची गोळी घेऊन सपाट करा आणि मोठ्या पुरीवर ठेवा, त्याच्या वरती छोटी पुरी ठेवा आणि कडा बंद करा.
आता तांदुळ पिठी वर ही पोळी लाटावी. लाटणे मध्ये दाबुन कडेला न्यावे म्हणजे गुळ कडे पर्यंत पोचेल. लाटुन झाल्यावर तव्यावर मध्यम आचेवर्ती पोळी दोन्ही बाजुने भाजुन काढा. तव्यावरून काढल्यावर पोळी जाळीवर ठेवा आणि गार झाल्यावर मोठ्या ताटात काढून ठेवा.
संपुर्ण गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
तुपा बरोबर गुळाची पोळी अप्रतीम लागते.
Comments
Post a Comment